Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तबला आवर म्हणण्याची आली पाळी!! पु. ल . देशपांडे

आठवणीतील पु. ल.


अश्याच एका इसमाला चांगली नोकरी मिळाली. तडकाफडकी बिचाऱ्याचे लग्नही झाले. शिताचा आणि सुताचा प्रश्न सुटला आणि छताचा प्रश्न उभा राहिला. कारण तो ज्या मालकाकडे राहत असे त्याला ’लग्न केल्यास ताबडतोड जागा सोडीन’ असे त्याने लिहून दिले होते. त्या मालकाचे लग्न एका संपादिकेशी झाले असल्यामुळे बायकोच्या हातचा स्वयंपाक आणि तिच्याच हातचे लेख या दुहेरी भडीमाराने तो अधिच जेरीला आल होता. फुंकणी आणि लेखणी ही एका हाती नांदणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळे कोणाचे लग्न म्हंटले की त्याला भयंकर संताप येत असे. दारात कोणी तुळशीचे लग्न लावलेले सुद्धा त्याला खपत नसे.
अश्या परिस्थितीत आमच्या मित्राने लग्न केले.


पहाटे दोनला वरात निघाली. घरमालकाने बेकायदा मिरवणूकी सारखी वरात आपल्या वाड्यासमोर अडवली. करारभंगामुळे मालक भाडेकरूला घरात घ्यायला तयार होईना. नाना तऱ्हेने लोकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्याची एकसष्टी करण्याचा सुद्धा विचार जाहीर केला. पण म्हतारा ऎकेना. शेवटी बॅंडवाल्यांना आणखी दोन तासांचे पैसे देऊन सदाशीव पेठेतून शुक्रवार पेठ, गंज पेठ पुन्हा उलट कसबा, नवा पुल करीत हिंडवीत आळंदीला पालखी सारखी पहाटे पाच वाजता संगमावर आणून वरात थांबली. बिचाऱ्या बॅंडवाल्यांनी ’संडे के संडे’ पासून ते प्रभाते मनीराम चिंतीत जावा’ पर्यंत येतील तितकी गाणी वाजवली आणि त्या नवपरिणीत जोडप्याला संगमावर सोडून बाकीची वरात परतली. बाकी संसाराची सुरूवात संगमावर व्हावी हाही योगायोग काही कमी अपूर्व नव्हता. आमच्या मित्राने आपल्या बायकोला’तुझ्या माझ्या जिवनसरिता-आयुष्याचा प्रवाह- पहाटेचा शुक्र’ वगैरे सांगुन पहाटेपर्यंतचा वेळ काढला आणि तेथून दोघांची खरी वरात सुरू झाली.नवऱ्यामुलीला तर बिचारीला बाप घरात घेईना आणि नवऱ्याला जागा मिळेना अश्या अवस्थेत दिवस काढावे लागले.


नुकतीच त्यांना जागा मिळाली. जागा म्हणजे जिथे पूर्वी मालक कोळश्य़ाच्या गोणी, कांदे, मधल्या काळात बाबागाडी वगैरे ठेवत असत असा पोटमाळा. या जागेसाठी प्रत्यक्ष पैशाच्या रूपाने काही घेणे जमले नाही. तेव्हा जागेच्या भाड्य़ाखेरीज माझ्या मित्रपत्नीला घरमालकाच्या घरचा स्वैपाक करणे, त्यांच्या वंशविस्ताराला वाढवणे-भरवीणे. मालकिणबाईच्या मोठेपणाच्या गोष्टी ऎकणे फावल्या वेळात त्यांच्या चोळ्या बेतणे आणि दर चोळी बेतताना "गेल्या खेपेपेक्षा थोड्य़ा अशक्तच झाल्यात बरं का शालिनीबाई"अस म्हणणे. शेजारच्या प्रमिलाबाईच्या फॅशनला नेहमी नावे ठेवून मालकिणबाईच्या साधेपणाचा गौरव करणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात.

परंतु तिच्याहून आमच्या मित्राची परिस्थिती फारच वाईट आहे. मालकांना तबला वाजवायचा नाद आहे आणि रात्री दोनदोन वाजेपर्यंत आमच्या मित्राला मोडक्या भात्याच्या पेटीतून ’कृष्णमुरारी’ वाजवायला लावून मालक तबला कुटीत बसतात. सध्या दिवसा माझ्या मित्राच्या कानाजवळ कुणी हे गाणेच नव्हे तर नुसते कृष्ण किंवा मुरारी म्हटलेतरी त्याला घेरी येते! अगदी '’जागा नको पण तबला अवर'’ म्हणण्याची पाळी आली आहे..