Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

झक्कास लेख : जगातली सगळ्यात भारी सुगरण कोण ? आजी-आई का बायको !

महाराष्ट्रीयन थाळी
आजी ही आपली जगातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात आवडती सुगरण... आजीच्या हातच्या अन्नाची चव दुसऱ्या कशालाच आणि कोणाच्याच हाताला नाही असं आपल्याला आपल्या लहानपणी ठामपणे वाटत असतं..! (मला अजूनही वाटतं...!) आपल्या दोन आज्यांपैकी एकतरी सुगरण असतेच (असायचीच...) तिच्या हातचं साधं वरण, पिठलं किंवा मेथीची वगैरे भाजीही अमृताहून गोड लागायची आपल्याला...!
लहानपण सरता सरता जगातल्या सगळ्यात भारी सुगरणिची जागा आई पटकावते...! तसं सोपं नसतं तिला... खूप कॉम्पिटिशन असते... एकतर आपल्याला 'चव' कळायला लागलेली असते, आवडी-निवडी ठरायला लागलेल्या असतात... आणि दुसरं म्हणजे कधीतरी एखाद्या "बेबीआत्या" किंवा "ताईमावशीच्या" घरी गेल्यावर तिथली चव आपल्याला आवडलेली असू शकते (बाय द वे, प्रत्येक मराठी कुटुंबात एखादी बेबी आत्या किंवा ताई मावशी, किंवा उलटं हे असतंच... नसेल तर ते मराठी कुटुंब मानलं जात नाही!!) हां... तर आईला कॉम्पिटिशन असते... पण ती आजीला न जमणारे काहीतरी चमचमित पदार्थ करणे, चिंच-गुळाची फोडणी दिलेली का होईना पण एखादी चायनीज डिश करणे वगैरे काय काय प्रयोग करून आपल्या हृदयातलं 'जगातली सगळ्यात भारी सुगरण' अशी जागा पटकावतेच अन् पंधरा-वीस वर्षं त्या जागेवर रहाते...!
मग, बायको तुमच्या आयुष्याच्या स्वैपाकघरात शिरते…! मग तीन गोष्टी घडू शकतात….

पहिली गोष्ट:
बायको जर हौशी आणि सुगरण असेल तर ती आईला अलगद स्वैपाकघरातून दिवाणखान्यात नेऊन ठेवते... आईच्या हातातलं लाटणं काढून घेऊन तिला रिमोट कंट्रोल देते... स्वतः कंबर कसून ओट्यापाशी उभी रहाते... मग रोजच्या मऊशार पोळ्यांपासून ते वीकेंडला केलेल्या पंजाबी, चायनीज, मेक्सिकन वगैरे प्रयोगांमधून ती घरातल्या सगळ्यांच्याच पोटात शिरते आणि हृदयातही जागा मिळवते...!
 maharashtrian chicken thali
दुसरी गोष्ट:
बायको जर हौशी सुगरण नसेल पण ती हुषार असेल तर, "तुझ्या आईसारखं मला नाही जमत बुवा... त्याच भारी करतात स्वैपाक" असं घरातल्या सगळ्यांसमोर जाहीर करून टाकते आणि आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या आईचा स्वैपाक मिटक्या मारत चापायला लागते...! आणि तिला कधी स्वैपाक करायची वेळ आली की "बघ हां... केलंय काहीतरी, तुझ्या आई सारखं झालंय का माहित नाही" असं म्हणत म्हणत एखादी इतकी अफलातून डिश समोर ठेवते की बास...!!

तिसरी गोष्ट:
बायको लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगते, “आईच्या हातच्या जेवणाचं कौतुक करायचं असेल तर तिच्याच कडे जाऊन रहायचं..! नाही तर जे ताटात समोर येईल ते गपगुमान गिळायचं…! आणि हेही मान्य नसेल तर स्वतः स्वयंपाक करायचा…!“. मग आपण गुमानपणे समोर येईल ते ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणत ‘स्वाहा’ करायला लागतो आणि मग हे ‘जीवन करी जिवित्वा’ असलेलं अन्न आपल्याला 'पूर्णब्रम्ह' वाटायला लागतं…. आणि ते देणारी आपली बायको जगातली सर्वांत सुंदर सुगरणही वाटायला लागते…!
एकुणात, या तीन पैकी कोणतीही एक (किंवा या सारखी कोणतीतरी) गोष्ट आपल्या आयुष्यात घडते… आणि मग पुढली तीस-चाळीस-पन्नास वर्षं बायको हीच आयुष्यातली सगळ्यात भारीची सुगरण बनते..!
आपल्या खाद्य जीवनाचा प्रवास, आजीच्या बेसनाच्या लाडू आणि मऊभातापासून सरु होऊन, आईच्या थालिपिठं, चकल्यांमार्गे, बायकोच्या पंजाबी आणि चायनीज पदार्थांपर्यंत येऊन पोचतो…!
त्या प्रेमानं आपल्याला भरवत रहातात, आपण त्या त्या वेळी त्यांना जगातली 'बेस्ट सुगरण' मानत त्यांनी भरवलेलं मनापासून खात रहातो…!
पण, 'भुकेच्या वेळी प्रेमानं रांधुन शिजवून भरवणारी व्यक्ती जगातली सगळ्यांत भारी सुगरण असते हे त्यांच्याही लक्षात येत नाही आणि आपल्याही…!'